व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

“जर किंस्ली करू शकतात तर मी का नाही?”

“जर किंस्ली करू शकतात तर मी का नाही?”

खांद्यावर हलकीशी थाप मारताच किंस्ली यांनी बायबल वाचायला सुरवात केली. ईश्वरशासित सेवा प्रशालेत हा त्यांचा पहिलाच भाग होता. बायबलमधील एकएक शब्द ते अगदी स्पष्टपणे आणि काळजीपूर्वक वाचत होते. पण, एक मिनिट! वाचताना ते आपल्या बायबलमध्ये पाहत नव्हते. असं का?

श्रीलंकेमध्ये राहणाऱ्या किंस्ली यांना दिसत नव्हतं, ऐकायलाही येत नव्हतं, इतकंच नव्हे तर अपंग असल्यामुळे त्यांना व्हिलचेअरचा आधारही घ्यावा लागायचा. तर मग अशा व्यक्तीला यहोवाबद्दल शिकणं आणि ईश्वरशासित सेवा प्रशालेत भाग घेणं कसं शक्य झालं? चला याबद्दल थोडं सांगतो.

किंस्ली यांच्यासोबत माझी पहिली भेट झाली, तेव्हा सत्य जाणून घेण्यासाठी ते किती उत्सुक आहेत हे पाहून मला खूप आश्चर्य वाटलं. याआधी त्यांनी अनेक साक्षीदारांसोबत बायबल अभ्यास केला होता. त्यांचं ब्रेल लिपीतलं, ‘सार्वकालिक जीवनाकडे नेणारे ज्ञान’ हे पुस्तक हाताळून हाताळून अगदी जुनं झालं होतं. * बायबल अभ्यास पुन्हा सुरू करण्यासाठी मी त्यांना विचारलं तेव्हा ते लगेच तयार झाले. पण, आमच्यापुढं दोन समस्या होत्या.

पहिली समस्या ही होती की किंस्ली एका आश्रमात राहायचे. या ठिकाणी त्यांच्यासारखे बरेच वृद्ध आणि अपंग लोक राहायचे. त्यामुळे, आजूबाजूला खूप गोंधळ असायचा. आणि किंस्ली यांना कमी ऐकू यायचं. त्यामुळे मला मोठ्या आवाजात त्यांच्याशी बोलावं लागायचं. परिणाम म्हणजे, आमची चर्चा तिथल्या सगळ्यांनाच ऐकू जायची!

दुसरी समस्या म्हणजे, किंस्ली एकाच वेळी जास्त माहिती समजू शकत नव्हते आणि जास्त वाचन करणंही त्यांना शक्य नव्हतं. पण, अभ्यासाचा फायदा व्हावा म्हणून ते स्वतःही खूप मेहनत घ्यायचे. ते आधीच अभ्यासाचा भाग पुन्हापुन्हा वाचून त्याची चांगली तयारी करायचे. तसंच, आपल्या ब्रेल बायबलमधून वचनं वाचून काढायचे. मग, मनातल्या मनात प्रश्नांची उत्तरंदेखील तयार करायचे. त्यांची ही पद्धत खूपच उपयुक्त ठरली. अभ्यास करताना सतरंजीवर मांडी घालून बसलेले किंस्ली, अगदी उत्सुकतेनं फरशीवर थाप मारून मोठ्या आवाजात शिकलेल्या गोष्टी सांगायचे. लवकरच, आम्ही आठवड्यातून दोनदा अभ्यास करू लागलो. आणि प्रत्येक अभ्यास दोन-दोन तास चालायचा.

सभेला उपस्थित राहणं आणि सहभाग घेणं

किंस्ली आणि पॉल

सभेला यायला किंस्ली खूप उत्सुक होते. पण त्यांच्यासाठी हे सोपं नव्हतं. कारण, व्हिलचेअरमधून कारमध्ये जाण्यासाठी आणि कारमधून उतरून सभागृहात जाण्यासाठी किंस्ली यांना मदतीची गरज होती. पण, मंडळीतले अनेक जण त्यांना आळीपाळीनं मदत करायचे. कारण किंस्ली यांना मदत करणं त्यांना एक विशेषाधिकार वाटायचा. सभेतील भाग ऐकू यावा म्हणून किंस्ली अगदी स्पिकरजवळ जाऊन बसायचे. सभेतील प्रत्येक भाग ते लक्ष देऊन ऐकायचे आणि उत्तरंही द्यायचे!

आमचा अभ्यास थोडा पुढं गेल्यानंतर किंस्ली यांनी ईश्वरशासित सेवा प्रशालेत नाव नोंदवायचं ठरवलं. ज्या दिवशी त्यांचं बायबल वाचन होतं, त्याच्या दोन आठवड्यांआधी मी त्यांना विचारलं, “तुमची तयारी नीट चालू आहे ना?” त्यांनी आत्मविश्वासानं उत्तर दिलं, “हो हो, मी तब्बल तीस वेळा सराव केलाय.” मी त्यांची प्रशंसा केली आणि त्यांना बायबल वाचून दाखवायला सांगितलं. त्यांनी बायबल उघडलं आणि पहिल्या ओळीवर बोट ठेवून वाचायला सुरवात केली. पण विशेष म्हणजे, वाचत असताना त्यांचं बोट पुढं सरकत नव्हतं. कारण, बायबल वाचनाचा तो संपूर्ण भाग त्यांनी अगदी तोंडपाठ केला होता!

हे पाहून माझे डोळे पाणावले. मला अश्रू आवरता आले नाहीत. मी अगदी थक्क होऊन त्यांच्याकडे पाहतच राहिलो आणि विचारलं, “फक्त तीस वेळा सराव करून तुम्ही सगळी वचनं पाठ केली?” ते म्हणाले, “नाही! मी दर दिवशी तीस वेळा सराव करत होतो.” किंस्ली जवळजवळ महिनाभर ती वचनं पुन्हापुन्हा वाचत होते. अगदी पाठ होईपर्यंत!

मग लेखाच्या सुरवातीला सांगितलेला तो खास दिवस उजाडला. त्यांचं बायबल वाचन संपताच, टाळ्यांचा कडकडाट संपता संपत नव्हता. या नव्या विद्यार्थ्याचा दृढ निश्चय पाहून अनेकांच्या डोळ्यांत पाणी भरून आलं. मंडळीतील एका बहिणीला भाषण द्यायची खूप भीती वाटायची. त्यामुळे तिनं प्रशालेत सहभाग घ्यायचं सोडून दिलं होतं. पण, आता तिनं पुन्हा आपलं नाव नोंदवण्यास सांगितलं. याचं कारण तिला विचारलं तेव्हा ती म्हणाली, “जर किंस्ली करू शकतात, तर मी का नाही?”

तीन वर्षं बायबलचा अभ्यास केल्यानंतर ६ सप्टेंबर २००८ रोजी किंस्ली यांनी बाप्तिस्मा घेतला. ते मृत्यूपर्यंत यहोवाला विश्वासू राहिले. १३ मे २०१४ रोजी त्यांचा मृत्यू झाला. नवीन जगात पूर्ण जोमानं, पूर्ण ताकदीनं आणि परिपूर्ण आरोग्यानं ते यहोवाची विश्वासूपणे सेवा करतील, असा त्यांचा पक्का भरवसा होता. (यश. ३५:५, ६)—पॉल मॅकमॅनस यांच्याद्वारे कथित.

^ परि. 4 हे पुस्तक १९९५ साली प्रकाशित करण्यात आलं होतं. पण, आता ते छापलं जात नाही.