व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

बायबल काय सांगतं

बायबल काय सांगतं

आपला पृथ्वीग्रह कसा अस्तित्वात आला याचं बायबलमध्ये अगदी नेमक्या शब्दांत वर्णन केलं आहे. त्यात म्हटलं आहे: ‘आकाश आणि पृथ्वी बनवण्यात आली त्या काळाचा हा वृत्तान्त आहे.’ (उत्पत्ती २:४) या विषयाबद्दल विज्ञान जे सांगतं त्याच्याशी बायबल मेळ खातं का? काही उदाहरणांकडे लक्ष द्या.

सुरुवातीला: आकाश आणि पृथ्वी निर्माण करण्यात आली

विश्‍व कायमचंच अस्तित्वात होतं का?

बायबलमध्ये उत्पत्ती १:१ यात असं म्हटलं आहे: “सुरुवातीला  देवाने आकाश आणि पृथ्वी निर्माण केली.”

जवळजवळ १९५० पर्यंत बऱ्‍याच जगप्रसिद्ध वैज्ञानिकांचं असं म्हणणं होतं, की विश्‍वाला सुरुवात नाही. ते कायमचंच अस्तित्वात आहे. पण अलीकडच्या काळात झालेल्या शोधांवरून अनेक वैज्ञानिक हे मान्य करू लागले आहेत, की आपल्या विश्‍वाला कुठंतरी सुरुवात झाली होती.

सुरुवातीला पृथ्वी कशी दिसायची?

उत्पत्ती १:२, ९ यात असं म्हटलं आहे: सुरुवातीला पृथ्वीवर पाण्याशिवाय “काहीच नव्हतं आणि ती ओसाड होती.”

आधुनिक काळात वैज्ञानिकांनी लावलेल्या शोधांतूनसुद्धा हेच दिसून येतं. जीवशास्त्रज्ञ पॅट्रिक शे असं म्हणतात: “सुरुवातीला आपल्या पृथ्वीवरचं वातावरण, ऑक्सिजन नसल्यामुळे जीवसृष्टीसाठी राहण्यालायक नव्हतं. . . . थोडक्यात, आधी सगळं काही विज्ञानकथेतल्या दृश्‍यासारखं दिसत होतं.” ॲस्ट्रॉनॉमी  मासिक म्हणतं: “सुरुवातीला पृथ्वीवर पाणीच पाणी होतं. कुठेच जमीन दिसत नव्हती.”

पृथ्वीवरचं वातावरण कसं बदलत गेलं?

उत्पत्ती १:३-५ यात सांगितल्याप्रमाणे असं दिसून येतं, की सुरुवातीला पृथ्वीच्या वातावरणातून प्रकाश जरी येत असला तरी पृथ्वीवरचं वातावरण इतकं दाट होतं, की प्रकाशाचा स्रोत दिसत नव्हता. पुढे बऱ्‍याच काळानंतर पृथ्वीच्या पृष्ठभागावरून सूर्य आणि चंद्र स्पष्टपणे दिसू लागले असतील.—उत्पत्ती १:१४-१८.

पृथ्वीवरची जीवसृष्टी ज्या सहा दिवसांत निर्माण करण्यात आली होती, तो प्रत्येक दिवस २४ तासांचा  होता असं बायबल सांगत नाही.

स्मिथसोनियन पर्यावरण संशोधन केंद्र असं म्हणतं, की पृथ्वीवरच्या दाट वातावरणामुळे सुरुवातीला पृथ्वीवर फक्‍त मंद प्रकाश होता. ते असं म्हणतं: “आधी पृथ्वी मिथेनच्या धुक्याने पांघरलेली होती.” नंतर, “हळूहळू हे धुकं ओसरत गेलं आणि निळं आकाश दिसू लागलं.”

पृथ्वीवर कोणत्या क्रमाने जीवसृष्टी अस्तित्वात आली?

उत्पत्ती १:२०-२७ म्हणतं, की सुरुवातीला मासे, पक्षी, जमिनीवरचे प्राणी आणि शेवटी मानव निर्माण करण्यात आले. शास्त्रज्ञांचंही असं म्हणणं आहे, की सुरुवातीला मासे आले आणि त्याच्या कितीतरी काळानंतर सस्तन प्राणी अस्तित्वात आले, आणि मग त्याच्याही बऱ्‍याच काळानंतर मानव अस्तित्वात आले.

काळाच्या ओघात सजीवांच्या शरीररचनेत कोणतेच बदल होऊ शकत नाहीत असं बायबल सांगत नाही

बायबल काय सांगत नाही?

काही लोक असा दावा करतात, की बायबल आधुनिक विज्ञानाशी सुसंगत नाही. पण बायबलमध्ये जे सांगितलं आहे त्याबद्दल गैरसमज असल्यामुळे ते सहसा असा दावा करतात.

हे विश्‍व किंवा पृथ्वी फक्‍त ६,००० वर्षं जुनी आहे असं बायबल मुळीच म्हणत नाही. उलट, साध्या शब्दांत बायबल फक्‍त इतकंच सांगतं, की “सुरुवातीला” पृथ्वी आणि विश्‍व निर्माण करण्यात आलं. (उत्पत्ती १:१) पण त्याला नेमका किती काळ लोटला हे बायबल सांगत नाही.

पृथ्वीवरची जीवसृष्टी ज्या सहा दिवसांत निर्माण करण्यात आली होती, तो प्रत्येक दिवस २४ तासांचा  होता असं बायबल सांगत नाही. उलट, या कालखंडाना बायबलमध्ये ‘दिवस’ हा शब्द वापरण्यात आला आहे. उदाहरणार्थ, बायबल सांगतं, की पृथ्वी आणि तिच्यावरच्या जीवसृष्टीची निर्मिती एका मोठ्या कालखंडात झाली. त्यात निर्मितीचे सहा ‘दिवससुद्धा’ येतात. पण उत्पत्तीच्या पहिल्या अध्यायात या संपूर्ण कालखंडाला एक ‘दिवस’ असं म्हटलं आहे. तिथे आपण असं वाचतो, की “यहोवा * देवाने पृथ्वी आणि आकाश निर्माण केलं त्या दिवसाचा  हा वृत्तान्त आहे.” (उत्पत्ती २:४) तर, देवाने निर्मितीच्या ज्या सहा ‘दिवसांमध्ये’ पृथ्वी आणि त्यावरची जीवसृष्टी बनवली तो खरंतर अतिशय मोठा काळ असला पाहिजे.

काळाच्या ओघात सजीवांच्या शरीररचनेत कोणतेच बदल होऊ शकत नाहीत असं बायबल सांगत नाही. उत्पत्तीच्या पुस्तकात असं म्हटलं आहे, की प्राण्यांना “आपापल्या जातींप्रमाणे”  बनवण्यात आलं होतं. (उत्पत्ती १:२४, २५) या वचनात ‘जाती’ हा शब्द सर्वसामान्यपणे सजीवांच्या प्रमुख गटांना सूचित करतो असं दिसतं. म्हणून असं म्हणता येईल, की प्राण्यांच्या एका ‘जातीमध्ये’ त्यांच्या वेगवेगळ्या प्रजातींचा आणि प्रकारांचा समावेश होऊ शकतो. त्यामुळे बायबलमध्ये वापरण्यात आलेला ‘जाती’ हा शब्द, एकाच प्रकारच्या प्रदेशात राहणाऱ्‍या प्राण्यामध्ये काळाच्या ओघात होणाऱ्‍या वेगवेगळ्या बदलांच्या शक्यतेला नाकारत नाही.

तुम्हाला काय वाटतं?

तर आत्तापर्यंत आपण पाहिलं की बायबलमध्ये, विश्‍वाची सुरुवात कशी झाली, सुरुवातीला पृथ्वी कशी होती आणि जीवन क्रमाक्रमाने कसं अस्तित्वात आलं याचं अगदी सोप्या आणि अचूक शब्दांत वर्णन करण्यात आलं आहे. जर या गोष्टी बायबलमध्ये इतक्या अचूकपणे सांगितलेल्या आहेत, तर निर्माणकत्याबद्दल बायबल जे सागतं तेही तितकंच अचूक असू शकत नाही का? एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका  असं म्हणतं: “सर्वसाधारणपणे पाहायला गेलं, तर एका अलौकिक किंवा अतिमानवीय घटनेतून पृथ्वी अस्तित्वात आली असावी असं मानणं आधुनिक काळात उपलब्ध असलेल्या वैज्ञानिक माहितीच्या विरोधात नाही.” *

^ परि. 17 बायबलमध्ये देवाचं नाव यहोवा असल्याचं सांगितलं आहे.

^ परि. 20 एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका  जीवनाची निर्मिती करण्यात आली होती या विचाराला पाठिंबा देत नाही.