व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

भेदभाव​—⁠हा आजार तुम्हाला झाला आहे का?

भेदभाव​—⁠हा आजार तुम्हाला झाला आहे का?

भेदभाव हा एका आजारासारखा आहे. हा आजार खूप वाईट आहे. ज्याला हा आजार होतो त्याला ते कळतसुद्धा नाही.

आज वेगवेगळ्या कारणांमुळे भेदभाव केला जातो. जसं की, राष्ट्र, जात, वंश, लिंग किंवा भाषा. इतकंच नाही, तर धर्म आणि समाजातली प्रतिष्ठा यांमुळेही भेदभाव केला जातो. आणि असेही काही लोक आहेत जे एखाद्याच्या वयावरून, शिक्षणावरून, शारीरिक दुर्बलतेवरून किंवा रंगरूपावरून भेदभाव करतात. आणि तरीसुद्धा त्यांना वाटतं, की आपण मूळीच भेदभाव करत नाही.

भेदभावाचा हा आजार तुम्हालाही होऊ शकतो का? इतर जण जेव्हा भेदभाव करतात तेव्हा ते लगेच आपल्या लक्षात येतं. पण आपण स्वतःसुद्धा भेदभाव करतो हे सहसा आपल्या लक्षात येत नाही. मात्र खरी गोष्ट ही आहे, की आपण सगळेच काही प्रमाणात भेदभाव करत असतो. लोकांच्या मनात जेव्हा एका विशिष्ट गटाबद्दल नकारात्मक भावना असते आणि जेव्हा त्याच गटातली एखादी व्यक्‍ती त्यांना भेटते, तेव्हा ते तिच्याशी कसं वागतात याबद्दल समाजशास्त्राचे प्रोफेसर, डेविड विल्यम म्हणतात: “ते तिच्याशी खूप वेगळं वागतात आणि या गोष्टीची त्यांना जाणीवसुद्धा होत नसते.”

दक्षिण-पूर्व युरोपमध्ये राहणाऱ्‍या योवीट्‌सच्या बाबतीतही असंच काहीसं घडलं. त्याच्या देशात असा एक गट आहे ज्याच्याबद्दल लोकांच्या मनात द्वेषाची भावना आहे. योवीट्‌स म्हणतो, “या गटातला एकही माणूस चांगला असू शकत नाही असंच माझं मत होतं. पण त्या गटाबद्दल माझ्या मनात भेदभावाची भावना आहे असं मला वाटलं नाही. कारण मी स्वतःला नेहमी हेच सांगायचो, की ‘त्यांच्याबद्दल माझं जे मत आहे ते बरोबरच आहे.’”

जातिभेद आणि इतर प्रकारचे भेद काढून टाकण्यासाठी अनेक सरकारांनी बरेच कायदे बनवले आहेत. पण त्यांमुळे भेदभाव नाहीसा झाला आहे का? नाही. कारण हे कायदे एका व्यक्‍तीच्या फक्‍त वागण्यावर बंधनं घालू शकतात. तिच्या भावनांवर किंवा विचारांवर ते बंधनं घालू शकत नाहीत. खरंतर, या भावनेचा जन्म माणसाच्या मनात होत असतो. मग याचा अर्थ असा होतो का, की भेदभावाची भावना कधीच नाहीशी होणार नाही? किंवा, भेदभावाच्या या आजारावर कोणतंही औषध नाहीये का?

पुढच्या लेखांमध्ये आपण पाच गोष्टींवर चर्चा करणार आहोत. या गोष्टी केल्यामुळे अनेकांना आपल्या मनातून भेदभाव काढून टाकायला मदत झाली आहे.