व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

असुरक्षिततेच्या भावनांवर कशी मात कराल?

असुरक्षिततेच्या भावनांवर कशी मात कराल?

एक नवीन जन्मलेलं गोंडस बाळ जगात येतं तेव्हा ते पूर्णपणे आपल्या आईवडिलांवर अवलंबून असतं. ते स्वतःचं संरक्षण करू शकत नाही. आपणही एकेकाळी त्या गोंडस बाळाप्रमाणे असाहाय्य होतो. आपण चालायला शिकलो तेव्हा अनोळखी लोक आपल्याला उंच धिप्पाड वाटायचे. पण आपण आपल्या आईबाबांच्या जवळ असलो, त्यांचा हात धरलेला असला की आपल्याला या लोकांची किंवा कशाचीही भीती वाटायची नाही.

आईवडिलांच्या प्रेमामुळे व प्रोत्साहनामुळे, मानसिक रीत्या आणि शारीरिक रीत्या आपला विकास झाला. आपल्या आईबाबांचं आपल्यावर प्रेम आहे या जाणिवेमुळे, आपल्या मनात सुरक्षिततेची भावना वाढत गेली. ते जेव्हा आपली प्रशंसा करायचे तेव्हा आपल्याला आणखी प्रगती करण्याचा जोम यायचा.

आपण जसजसे मोठे होत गेलो तसतसा आपला मित्र परिवारही वाढत गेला. त्यांपैकी काही अगदी जवळचे झाले. या मित्रांमुळेदेखील आपल्या मनात सुरक्षिततेची भावना वाढली. हे मित्र सोबत असल्यास, शाळेच्या अनोळखी वातावरणात आपल्याला इतकी भीती वाटायची नाही.

मुलांच्या विकासासाठी खरंतर अशाच प्रकारचं वातावरण पोषक असतं. पण, काही तरुणांचे जवळचे मित्र नव्हते, किंवा त्यांच्या आईवडिलांकडून त्यांना हवं तसं प्रेम मिळालं नाही. मानसी नावाची एक तरुणी म्हणते: “मी जेव्हा कुटुंबांना एकत्र मिळून काम करत असल्याचं किंवा आनंदात असल्याचं चित्र पाहते तेव्हा मला वाटतं, की माझ्या लहानपणी मलाही अशा गोष्टींचा आनंद लुटता आला असता तर किती बरं झालं असतं.” * तुम्हालाही मानसीप्रमाणं वाटतं का?

असुरक्षित वातावरणात वाढल्यामुळे उद्‌भवणाऱ्या समस्या

लहानाचे मोठे होत असताना तुम्हाला कदाचित वाईट अनुभव आले असतील. तुम्हाला तुमच्या आईवडिलांकडून प्रेम किंवा प्रोत्साहन मिळालं नसेल. तुमच्या मनात कदाचित, त्यांच्यात होत असलेली भांडणं, त्यानंतर ते एकमेकांपासून वेगळे झाल्याच्या आठवणी असतील. ‘माझ्यामुळंच आईबाबा एकमेकांपासून वेगळे झाले,’ असा तुमचा चुकीचा समजही कदाचित झाला असेल. किंवा तुमच्या मनात यापेक्षाही कटू आठवणी असतील. आई किंवा बाबा यांपैकी कोणीतरी तुम्हाला सतत शिवीगाळ किंवा मारहाण करत असल्याच्या आठवणी असतील. आणि अशा सगळ्या वाईट अनुभवांमुळे कदाचित तुमचा आत्मविश्वास वाढला नसेल.

मनात असुरक्षिततेची भावना असलेल्या मुलांची सहसा काय प्रतिक्रिया असते? काही मुलं किशोरावस्थेतच ड्रग्जच्या किंवा दारूच्या आहारी जातात. तर काही मुलं, आपण एकटे नाही, आपलेसुद्धा मित्र आहेत, हे दाखवण्यासाठी कुठल्यातरी टोळीत सामील होतात. आणि काही मुलं, प्रेम आणि जिव्हाळा मिळण्यासाठी आसुसलेली असल्यामुळं कुठल्यातरी प्रेमप्रकरणात अडकतात. पण त्यांचं हे प्रकरण नेहमीच टिकतं असं नाही. या तुटलेल्या नातेसंबंधामुळं ते मानसिक रीत्या खचतात, त्यांना आणखीनच असुरक्षित वाटू लागतं.

मनात असुरक्षिततेची भावना असलेले सर्वच किशोरवयीन, वर सांगितलेल्या फंदात पडत नसले तरी, त्यांना आपण काहीच कामाचे नाही, असं वाटत राहतं. अंजू नावाची एक तरुणी म्हणते: “माझी आई मला नेहमी, ‘तू काहीच कामाची नाहीस,’ असं म्हणत राहायची त्यामुळं मलाही तसंच वाटत राहिलं. तिनं कधी माझी प्रशंसा केल्याचं किंवा मला जवळ घेऊन माझ्या डोक्यावरून मायेनं हात फिरवल्याचं मला आठवत नाही.”

फक्त बालपणी आलेल्या वाईट अनुभवांमुळेच, मनात असुरक्षिततेची भावना वाढते असं नाही. घटस्फोट, वाढत्या वयामुळे येणाऱ्या समस्या किंवा स्वतःच्या रूपाविषयी मनात असलेल्या कमीपणाच्या भावना यांमुळेही मनात असुरक्षिततेच्या भावना वाढू शकतात. कारण काहीही असलं तरी, या अशा भावनांमुळे आपण आपला आनंद गमावतो आणि इतरांबरोबरचा आपला नातेसंबंधही बिघडू शकतो. मग, मनातील अशा भावनांवर मात करण्यासाठी आपण काय करू शकतो?

देवाला आपली काळजी आहे

आपल्या मनात असुरक्षिततेच्या भावना असतील, तर यांवर मात करण्यासाठी आपण देवाकडे वळू शकतो. कारण तो आपल्याला मदत करायला तयार आहे.

देवाने यशया नावाच्या एका संदेष्ट्याद्वारे असा संदेश दिला: “घाबरू नको, कारण मी तुझा देव आहे; मी तुला शक्ती देतो; मी तुझे साहाय्यही करतो; मी आपल्या धार्मिकतेच्या उजव्या हाताने तुला सावरतो.” (यशया ४१:१०, १३) हे ऐकून खरंच किती दिलासा मिळतो! आपल्याला मदत करण्याची देवाची इच्छा आहे. तो जणू काय आपला हात धरायला तयार आहे. त्यामुळं आपल्याला घाबरण्याची काहीच गरज नाही.

बायबलमध्ये यहोवा देवाच्या अशा बऱ्याच उपासकांची उदाहरणं आहेत, ज्यांच्या मनात असुरक्षिततेच्या भावना होत्या; पण ते जणू काय देवाचा हात धरायला शिकले. हन्ना नावाची देवाची एक उपासक होती. तिला मूल होत नसल्यामुळे, ‘आपण काही कामाचे नाही,’ अशी भावना तिच्या मनात होती. तिच्या वांझपणाबद्दल तिची थट्टादेखील केली जायची. ती इतकी निराश झाली होती की जेवणावरून तिचे मनंच उडालं होतं. ती सतत रडायची. (१ शमुवेल १:६, ८) पण एकदा देवासमोर तिने आपलं मन मोकळं केल्यानंतर मात्र ती निश्‍चिंत झाली.—१ शमुवेल १:१८.

स्तोत्रकर्ता दावीद याच्याही मनात काही वेळा असुरक्षिततेच्या भावना आल्या होत्या. राजा शौल कित्येक वर्ष त्याला ठार मारण्यासाठी त्याच्या मागे हात धुवून लागला होता. दाविदावर आलेल्या अशा अनेक जीवघेण्या प्रसंगांतून तो बचावला होता, पण मनात येणाऱ्या नकारात्मक भावनांतून आपली कधीच सुटका होणार नाही, असं त्याला वाटायचं. (स्तोत्र ५५:३-५; ६९:१) तरीपण, “मी स्वस्थपणे पडून लागलाच झोपी जातो, कारण हे परमेश्वरा, तूच मला एकांतात निर्भय ठेवतोस,” असं त्याने लिहिलं.—स्तोत्र ४:८.

हन्ना आणि दावीद या दोघांनी यहोवा देवावर आपल्या चिंता टाकून दिल्यानंतर त्यांना बरं वाटलं, कारण तोच आपल्याला मदत करू शकतो याची त्यांना खातरी पटली होती. (स्तोत्र ५५:२२) आपणही आपल्या चिंता यहोवा देवावर कशा टाकू शकतो? पुढं तीन मार्ग दिले आहेत.

सुरक्षिततेची भावना वाढवण्याचे तीन मार्ग

१. यहोवा देवाला आपला प्रेमळ पिता मानून त्याच्यावर भरवसा ठेवायला शिका.

येशूने आपल्याला त्याचा पिता यहोवा हा “एकच खरा देव” आहे, हे ओळखण्यास आर्जवलं. (योहान १७:३) पौल नावाच्या एका प्रेषितानं असं आश्वासन दिलं, की यहोवा देव “आपल्यापैकी कोणापासूनही दूर नाही.” (प्रेषितांची कृत्ये १७:२७) आणि याकोब नावाच्या देवाच्या एका सेवकानं असं लिहिलं: “देवाजवळ या म्हणजे तो तुम्हांजवळ येईल.”—याकोब ४:८.

मनात येणाऱ्या भीतीच्या भावनांवर मात करण्यासाठी आपण हे ओळखणं अत्यंत महत्त्वाचं आहे, की आपला एक स्वर्गीय पिता आहे, त्याचं आपल्यावर प्रेम आहे आणि त्याला आपली काळजी आहे. असा भरवसा एका रात्रीत वाढणार नाही. पण असा भरवसा वाढवल्यावरच मनातील असुरक्षिततेच्या भावना कमी होऊ शकतात, असा अनेकांना अनुभव आला आहे. कनिका नावाची एक तरुणी म्हणते: “मी जेव्हा यहोवा देवाला माझा पिता मानू लागले तेव्हा, ‘मी माझ्या मनातल्या भावना, म्हणजे मनातले अगदी खोल विचारसुद्धा आता कुणाला तरी सांगू शकते,’ अशी खातरी मला वाटू लागली. यामुळं मला खरंच खूप हलकं-हलकं वाटू लागलं.”

रेचल म्हणते: “एक काळ असा आला जेव्हा मी एकटी पडले. आईबाबा माझ्या सोबत नव्हते. पण यहोवामुळे मला पुन्हा सुरक्षित वाटू लागलं. मी त्याच्याशी बोलू शकते, समस्या येतात तेव्हा मला मदत कर, असं त्याला म्हणू शकते. आणि त्याने खरंच मला मदत केली.” *

२. आध्यात्मिक कुटुंब शोधा.

“तुम्ही सर्व एकमेकांचे बहीण भाऊ आहात,” असं येशूने आपल्या शिष्यांना शिकवलं. (मत्तय २३:८, ईझी-टू-रीड व्हर्शन) शिष्यांनी एकमेकांवर खरं प्रेम करावं आणि ज्याला ‘आध्यात्मिक कुटुंब’ म्हणतात त्याचा भाग व्हावं, अशी त्याची इच्छा होती.—मत्तय १२:४८-५०; योहान १३:३५.

यहोवाच्या साक्षीदारांच्या मंडळ्यांमध्ये तुम्हाला या आध्यात्मिक कुटुंबाचं प्रेम अनुभवायला मिळेल. यामुळं तुम्हाला सांत्वन मिळेल. (इब्री लोकांस १०:२४, २५) या मंडळ्यांमध्ये होणाऱ्या सभा जखमांवर लावल्या जाणाऱ्या मलमाप्रमाणे आहेत, असं अनेकांना वाटलं आहे.

“माझ्या मंडळीत माझी एक खास मैत्रीण होती. तिला माझं दुःख समजायचं. ती माझं बोलणं ऐकून घ्यायची. मला बायबलमधून वचनं वाचून दाखवायची. आणि माझ्यासाठी प्रार्थनासुद्धा करायची. तिनं मला कधीच एकटं सोडलं नाही. मला कधीकधी माझ्या मनातल्या भावना नीट व्यक्त करायला जमायचं नाही, तेव्हा ती मला मदत करायची. तिच्याबरोबर बोलल्यानंतर मला खूप हलकं वाटायचं. तिच्या मदतीमुळं मला सुरक्षित वाटू लागलं,” असं इशा म्हणते. तसंच रेचल म्हणते: “मंडळीत जणू मला, ‘आई आणि बाबा’ मिळाले. आणि मंडळीतल्या सर्वांनी माझ्यावर भरभरून प्रेम केलं. आता मला सुरक्षित वाटतं.”

३. इतरांवर प्रेम करा आणि दया दाखवा.

इतरांवर प्रेम करून व दया दाखवून आपण कधीही न तुटणारे मैत्रीचे बंध जोडू शकतो. येशूने म्हटलं: “घेण्यापेक्षा देणे ह्यात जास्त धन्यता [आनंद] आहे.” (प्रेषितांची कृत्ये २०:३५) आपण इतरांवर जितकं भरभरून प्रेम करू तितकं लोकही आपल्यावर भरभरून प्रेम करतील, हे तुम्हाला दिसून येईल. “द्या म्हणजे तुम्हास दिले जाईल,” असं येशूने त्याच्या शिष्यांना सांगितलं.—लूक ६:३८.

इतरांवर प्रेम केल्यानं व इतरांचं प्रेम मिळवल्यानं आपल्याला आणखी सुरक्षित वाटतं. आणि अशा प्रकारचं प्रेम कधी संपत नाही, असं बायबलमध्ये म्हटलं आहे. (१ करिंथकर १३:८) मारिया नावाची एक बहीण म्हणते: “माझ्या मनात स्वतःविषयीचे काही चुकीचे विचार आहेत. पण, स्वतःचाच जास्त विचार करत बसण्यापेक्षा इतरांना मदत करून मी माझ्या या नकारात्मक विचारांवर मात करते. आणि असं केल्यानं मला खूप समाधान मिळतं.”

सर्वांनाच सुरक्षित वाटेल असा पुढं येणारा एक काळ

जादुई कांडी फिरवल्यानंतर लगेच व कायमचं बरं वाटायला लागतं, असा लोक विचार करतात. पण वर सांगितलेल्या गोष्टी जादूच्या कांडीप्रमाणे नाहीत. म्हणजे, त्या गोष्टींचा एकदाच अवलंब केला की, सर्व समस्या क्षणात नाहीशा होतील आणि तुम्हाला लगेच पूर्णपणे बरं वाटायला लागेल, असं नाही. पण त्यांचा अवलंब केल्यानं बराच फरक पडतो. आधी आपण जिचा उल्लेख केला होता ती कनिका म्हणते: “माझ्या मनात अजूनही असुरक्षिततेची भावना डोकावते. पण आता माझा आत्मविश्वास वाढला आहे. देवाला माझी काळजी आहे ही जाणीव मला आहे. शिवाय, माझे पुष्कळ जवळचे मित्रदेखील आहेत ज्यांच्यामुळं मला सुरक्षित वाटतं.” रेचललाही असंच वाटतं. ती म्हणते: “मी अधूनमधून दुःखी होते; नाही असं नाही. पण आता मी मार्गदर्शनासाठी माझ्या आध्यात्मिक बहीण-भावांकडे वळू शकते. ते मला सकारात्मक विचार करायला मदत करतात. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी दररोज माझ्या स्वर्गीय पित्याबरोबर बोलू शकते. यानं खरंच खूप मोठा फरक पडतो.”

बायबलमध्ये एका नवीन जगाबद्दल सांगितलं आहे, जेव्हा पृथ्वीवर राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला सुरक्षित वाटेल

यासोबतच बायबलमध्ये आणखी एका उपायाबद्दल सांगितलं आहे जो कायमस्वरूपी आहे. म्हणजे अशा एका नवीन जगाबद्दल सांगितलं आहे, जेव्हा पृथ्वीवर राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला सुरक्षित वाटेल. त्या वेळी “सगळे आपापल्या द्राक्षीखाली व अंजिराच्या झाडाखाली बसतील, कोणी त्यांस घाबरवणार नाही.” (मीखा ४:४) नवीन जगात कोणीही आपल्याला त्रास देणार नाही. जीवनात घडलेल्या अगदी वाईट गोष्टीसुद्धा आपण “स्मरणार” नाही, म्हणजे त्यांची आठवण होऊन आपण दुःखी होणार नाही. (यशया ६५:१७, २५) यहोवा देव आणि त्याचा पुत्र येशू खरी नीतिमत्ता स्थापित करतील. त्यानंतर “सर्वकाळचे स्वास्थ्य [शांती] व निर्भयता” असेल.—यशया ३२:१७. ▪ (w16-E No. 1)

^ परि. 5 या लेखातील सर्व नावं बदलण्यात आली आहेत.

^ परि. 21 यहोवासोबत मैत्री करून त्याच्याजवळ येऊ इच्छिणाऱ्यांसाठी यहोवाचे साक्षीदार मोफत बायबल अभ्यास चालवतात.