व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

मुख्य विषय | जेव्हा आपल्या प्रिय व्यक्तीचा मृत्यू होतो

मृत्यूमुळे दुःखी असलेल्यांचं सांत्वन करा

मृत्यूमुळे दुःखी असलेल्यांचं सांत्वन करा

एखाद्याच्या जवळची व्यक्ती मरण पावते तेव्हा त्यांचं सांत्वन कसं करावं हे आपल्याला कळत नाही. कधीकधी अशा वेळी नेमकं काय बोलावं आणि काय करावं हेच आपल्याला सुचत नाही. त्यामुळे कित्येकदा काही न करता आपण गप्पच बसतो. पण अशा वेळी वेगवेगळ्या मार्गाने आपण त्यांची व्यावहारिक मदत करू शकतो.

अशा वेळी तुम्ही फक्त त्यांच्यासोबत असणं आणि “जे झालं त्याचं मला फार दुःख वाटतं” एवढे शब्द बोलणंही पुरेसं असतं. काही संस्कृतीत, दुःखी व्यक्तीला मिठी मारणं किंवा त्यांच्या खांद्यावर हात ठेवणं यानेही त्यांच्याबद्दल काळजी दाखवली जाते. जेव्हा ते बोलत असतात तेव्हा त्यांचं बोलणं सहानुभूतीने ऐका. कित्येकदा दुःखात बुडालेल्या कुटुंबाला रोजची कामं करणंदेखील जड जाऊ शकतं. अशा वेळी आपण त्यांच्यासाठी जेवण बनवू शकतो, त्यांच्या मुलांना सांभाळू शकतो किंवा अंत्यविधीच्या तयारीसाठी काही मदत लागली तर त्यातसुद्धा हातभार लावू शकतो. चांगल्या शब्दांपेक्षा आपण केलेली मदत जास्त सांत्वनदायक ठरेल.

काही काळ सरला की तुम्ही त्यांच्याशी मृत व्यक्तीबद्दल बोलू शकता. मृत व्यक्तीच्या चांगल्या गुणांबद्दल किंवा काही गोड आठवणीबद्दल बोला. अशा चर्चेमुळे त्यांच्या चेहऱ्यावर हास्य उमलेल. उदाहरणार्थ, पॅम जिच्या पतीचे सहा वर्षांपूर्वी निधन झालं ती म्हणते: “लोक कित्येकदा इयनबद्दल अशा काही चांगल्या गोष्टी सांगतात ज्यांबद्दल मला माहीतच नव्हतं आणि त्या ऐकून मला खूप बरं वाटतं.”

संशोधक असं म्हणतात की दुःखी व्यक्तींना सुरुवातीला खूप मदत केली जाते. पण त्यांचे जवळचे लोक आपल्या जीवनात व्यस्त होतात आणि काही काळानंतर त्यांच्या गरजांकडे कोणीच लक्ष देत नाही. त्यामुळे तुमच्या जवळची व्यक्ती जर अशा दुःखातून सावरण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांना विसरू नका, त्यांच्याशी नेहमी संपर्कात राहा. * बऱ्याच दुःखी लोकांना जेव्हा मनात साठवून ठेवलेलं दुःख कोणाकडे तरी हलकं करण्याची संधी मिळते तेव्हा त्यांना मनापासून बरं वाटतं.

कॉओरी जपानमध्ये राहणारी एक तरूणी आहे. तिच्या आईचा मृत्यू झाल्याच्या पाठोपाठ दीड वर्षातच तिच्या मोठ्या बहिणीचादेखील मृत्यू झाला. तिच्यावर जणू काही दुःखाचा डोंगरच कोसळला. पण या दुःखाच्या काळात तिच्या जिवलग मित्रांनी तिची साथ सोडली नाही. त्यातलीच एक म्हणजे रीतसुको, जी तिच्यापेक्षा वयानं मोठी होती. तिनं तिच्यावर आईसारखी माया केली. रीतसुकोबद्दल कॉओरी म्हणते “खरं सांगायचं तर सुरुवातीला तिचं असं वागणं मला जराही आवडलं नाही, माझ्या आईची जागा कोणीच घेऊ शकत नव्हतं आणि कोणी घ्यावी अशी माझी इच्छादेखील नव्हती. पण मम्मा रीतसुको माझ्याशी प्रेमानं वागली आणि ती मला जवळची वाटू लागली. दर आठवडी आम्ही दोघी प्रचाराला आणि सभेला सोबत जायचो. ती मला चहासाठी बोलवायची आणि माझ्यासाठी जेवणदेखील आणायची. कित्येकदा ती मला पत्र लिहायची आणि कार्डसदेखील द्यायची. मम्मा रीतसुकोच्या सकारात्मक दृष्टिकोनाचा माझ्यावर चांगला प्रभाव पडला.”

कॉओरीच्या आईला जाऊन बारा वर्षं झाली आहेत. आज ती आणि तिचे पती दोघंही, आपला जास्तीत जास्त वेळ लोकांना देवाच्या राज्याची सुवार्ता सांगण्याचं काम करण्यात घालवतात. कॉओरी म्हणते: “मम्मा रितसुको, आजही माझी तेवढीच काळजी करते. मी जेव्हा घरी परत जाते तेव्हा तिला नेहमी भेटते आणि तिच्यासोबत वेळ घालवून मला खूप प्रोत्साहन मिळतं.”

पॉली साइप्रसमध्ये राहणारी एक यहोवाची साक्षीदार आहे. तिलादेखील अशीच मदत मिळाली. पॉलीचे पती, सॉजोस दयाळू स्वभावाचे होते. अनाथांना व विधवांना अनेकदा आपल्या घरी जेवायला बोलावून आणि त्यांचा पाहुणचार करून, ख्रिस्ती मंडळीतील जबाबदार व्यक्तींसमोर त्यांनी एक चांगलं उदाहरण मांडलं होतं. (याकोब १:२७) पण दुःखाची गोष्ट म्हणजे वयाच्या ५३ व्या वर्षी त्यांना ब्रेन-ट्यूमर झाला. पॉली म्हणते “ज्याच्यासोबत मी लग्नाची ३३ वर्षं घालवली त्या माझ्या एकनिष्ठ पतीला मी गमावलं.”

दुःखी लोकांना मदत करण्याचे व्यावहारिक मार्ग शोधा

त्यांच्या मृत्यूनंतर पॉली, डॅनियल या आपल्या १५ वर्षांच्या धाकट्या मुलाला घेऊन कॅनडाला राहायला गेली. ते तिथंदेखील यहोवाच्या साक्षीदारांच्या सभेला जाऊ लागले. पॉली म्हणते, “नवीन मंडळीतील माझ्या मित्र-मैत्रिणींना, आमच्या भूतकाळाबद्दल आणि आम्ही कुठल्या वाईट प्रसंगांना तोंड दिलं याबद्दल माहीत नव्हतं. पण जास्त ओळख नसली तरी त्यांच्या प्रेमळ बोलण्यामुळे व मदतीमुळे आम्हाला खूप सांत्वन मिळालं. माझ्या मुलाला ज्या वेळी आपल्या वडिलांची सर्वात जास्त गरज होती त्या वेळी ही मदत खूप मोलाची ठरली. मंडळीत पुढाकार घेणाऱ्या बांधवांनी डॅनियलवर जातीनं लक्ष दिलं.” पॉली हे ही सांगते की खासकरून एका बांधवाने डॅनियलवर विशेष लक्ष दिलं. तो बांधव जेव्हा आपल्या मित्रांसोबत वेळ घालवायचा किंवा खेळायला जायचा तेव्हा नेहमी डॅनियलला सोबत घेऊन जायचा. आज पॉली आणि डॅनियल दोघेही आनंदी आहेत.

जे दुःखी आहेत त्यांना आपण बऱ्याच मार्गानं व्यावहारिक मदत पुरवू शकतो व सांत्वन देऊ शकतो. त्यासोबतच बायबलमध्ये भविष्यासाठी एक सुंदर आशा दिली आहे ज्यामुळे आपल्याला सांत्वन मिळू शकतं. (wp16-E No. 3)

^ परि. 6 काही जणांनी, आठवण राहावी म्हणून आपल्या कॅलेंडरमध्ये मृत जनांच्या निधनाची तारीख नोंद करून ठेवली आहे. यामुळे त्या दिवशी किंवा त्याच्या जवळच्या तारखेला ते दुःखात असलेल्यांच सांत्वन करू शकतात.