व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

एका प्राचीन गुंडाळीतल्या मजकुराचा खुलासा

एका प्राचीन गुंडाळीतल्या मजकुराचा खुलासा

१९७० साली एन-गेदी या ठिकाणी सापडलेला जळलेल्या गुंडाळीचा भाग वाचण्यापलीकडे होता. थ्री-डी स्कॅनिंग तंत्र याच्या साहाय्याने त्या गुंडाळीत लेवीय पुस्तकाचा भाग असल्याचा आणि त्यात देवाचं वैयक्‍तिक नाव असल्याचा खुलासा झाला

१९७० मध्ये मृत समुद्राच्या पश्‍चिम किनाऱ्‍याजवळ इस्राएलच्या एन-गेदी या ठिकाणी पुरातत्वशास्त्रज्ञांना पार जळून गेलेली एक गुंडाळी सापडली. त्यांना ही गुंडाळी एका सभास्थानाच्या उत्खननाच्या वेळी सापडली. ज्या गावात हे सभास्थान होतं ते कदाचित सहाव्या शतकात नाश करण्यात आलं, तेव्हा हे सभास्थानही जाळण्यात आलं होतं. त्या गुंडाळीची इतकी वाईट अवस्था झाली होती की ती उघडून वाचणं शक्य नव्हतं. ती उघडली असती तर तिला आणखी नुकसान झालं असतं. अशा वेळी या गुंडाळीत जे लिहिलं होतं त्याचा उलगडा झाला तो थ्री-डी स्कॅनिंग तंत्र याच्या साहाय्याने. नवीन डिजिटल इमेजिंग सॉफ्टवेअर याच्या मदतीने त्यावरचा मजकूर वाचता आला.

स्कॅनिंगमुळे काय समोर आलं? त्या गुंडाळीत बायबलची वचनं होती. त्यावर लेवीय पुस्तकाच्या सुरुवातीची वचनं लिहिलेली होती. त्या वचनांत टेट्राग्रॅमटन; हिब्रू भाषेत असलेलं देवाचं नावही होतं. हे लिखाण कदाचित इ.स. ५० ते इ.स. ४०० या कालावधीतलं असावं. मृत समुद्राजवळ सापडलेली गुंडाळी सर्वात जुनी मानली जाते आणि एन-गेदी इथे सापडलेली ही यानंतरची सर्वात जुनी गुंडाळी आहे. द जेरुसलेम पोस्ट यात गील जोहर यांनी लिहिलं, “एन-गेदीमध्ये सापडलेल्या लेवीय पुस्तकातल्या भागाचा उलगडा झाला त्याआधी सापडलेली बायबल हस्तलिखिते, म्हणजे मृत समुद्राजवळ सापडलेल्या गुंडाळ्या (जवळपास इ.स.पू. १००) व आलेप्पो कोडेक्स (इ.स. ९३०) यांत जवळपास १,००० वर्षांचा फरक होता.” तज्ज्ञांच्या मते एन-गेदीमध्ये सापडलेल्या गुंडाळीच्या लिखाणावरून समजतं, की तोरहचं [मोशेच्या नियमशास्त्राचं] लिखाण होऊन हजार वर्षांचा काळ लोटला असला तरीही त्याच्या मूळ मजकुरांत बदल झाला नव्हता. तसंच, नक्कल करणाऱ्‍यांकडून सहसा होणाऱ्‍या चुकाही यांत नव्हत्या.