व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

निनवे शहरात दिमाखदार इमारती आणि स्मारकं होती

तुम्हाला माहीत होतं का?

तुम्हाला माहीत होतं का?

योनाच्या दिवसांनंतर निनवे शहराचं काय झालं?

इ.स.पू. सातव्या शतकापर्यंत, अश्‍शूर एक जागतिक महासत्ता बनलं होतं. या महासत्तेबद्दल ब्रिटिश म्यूझियम ब्लॉगमध्ये असं सांगितलं आहे, की “अश्‍शूरचं साम्राज्य पश्‍चिमेकडे असलेल्या सायप्रसपासून पूर्वेकडे असलेल्या इरानपर्यंत पसरलेलं होतं. आणि एक काळ असा होता, की अश्‍शूरच्या साम्राज्यात इजिप्तसुद्धा येत होतं.” त्या काळात अश्‍शूरची राजधानी, निनवे शहर हे जगातलं सगळ्यात मोठं शहर होतं. तिथे दिमाखदार स्मारकं, डोळे दिपवून टाकणारे बागबगिचे, अलिशान महाल आणि भव्यदिव्य ग्रंथालयं होती. प्राचीन निनवे शहरात सापडलेल्या शीलालेखांवरून दिसून येतं, की इतर अश्‍शूरी राजांप्रमाणेच अश्‍शूर-बनीपल राजासुद्धा स्वतःला “जगाचा राजा” समजायचा. त्या काळात, अश्‍शूर आणि निनवेला कोणीच हरवू शकत नाही असं मानलं जायचं.

त्या काळात अश्‍शूर हे जगातलं सगळ्यात मोठं साम्राज्य होतं

पण अश्‍शूरचं साम्राज्य जेव्हा आपल्या यशाच्या शिखरावर होतं, तेव्हा यहोवाचा संदेष्टा सफन्या याने अशी भविष्यवाणी केली: “[यहोवा] . . . अश्‍शूरचा नाश करेल, आणि तो निनवेला वाळवंटासारखं रुक्ष आणि उजाड करून टाकेल.” इतकंच नाही, तर नहूम संदेष्ट्यानेसुद्धा अशी भविष्यवाणी केली: “चांदी लुटा, सोनं लुटा! . . . शहर रिकामं, ओसाड आणि उद्ध्‌वस्त झालं आहे! . . . तुला पाहणारा प्रत्येक जण तुझ्यापासून दूर पळेल आणि म्हणेल, ‘निनवेचा सर्वनाश झाला आहे!’” (सफ. २:१३; नहू. २:९, १०; ३:७) या भविष्यवाण्या ऐकल्यावर लोकांनी कदाचित असा विचार केला असेल: ‘हे शक्य तरी आहे का? अश्‍शूरच्या महासत्तेला कोण हरवू शकतं?’ खरंच, त्या काळात या महासत्तेला हरवणं जवळजवळ अशक्यच वाटत होतं.

निनवे शहर ओसाड पडून राहिलं!

पण जे शक्य नव्हतं ते शक्य झालं. इ.स.पू. सातव्या शतकाच्या शेवटी, बाबेलच्या आणि मेदच्या लोकांनी अश्‍शूरवर विजय मिळवला. पाहता पाहता, निनवे शहर ओसाड पडलं आणि काळाच्या ओघात लोकांना त्याचा पूर्णपणे विसर पडला. द मेट्रोपोलिटन म्यूझियम ऑफ आर्ट इन न्यूयॉर्क नावाच्या एका प्रकाशनात असं म्हटलं आहे, की “मध्य युगापर्यंत हा प्रदेश ओसाड पडला आणि जमिनीखाली गाढला गेला. त्यानंतर निनवेची ओळख फक्‍त बायबलमध्ये राहिली.” बिब्लिकल आर्कियोलॉजी सोसायटी ऑनलाईन आर्काइव्ह यानुसार सन १८०० च्या सुरुवातीच्या काळात, “अश्‍शूरची महान राजधानी, निनवे खरंच अस्तित्वात होती का याबद्दल कोणालाच माहीत नव्हतं.” पण मग १८४५ मध्ये, ऑस्टन हेन्री नावाच्या एका उत्खनन तज्ज्ञाने तिथली जागा खोदायला सुरुवात केली. तिथे सापडलेल्या अवशेषांवरून हे स्पष्ट झालं, की निनवे हे एक अतिशय वैभवशाली शहर होतं.

अशा प्रकारे, निनवे शहराबद्दल केलेल्या भविष्यवाण्या तंतोतंत पूर्ण झाल्या. त्यावरून, आजच्या राजकीय सत्तांचा अंत होईल असं जे बायबलच्या भविष्यवाण्यांमध्ये सांगितलं आहे तेसुद्धा नक्कीच पूर्ण होईल या गोष्टीवरचा आपला भरवसा आणखीन वाढतो.—दानी. २:४४; प्रकटी. १९:१५, १९-२१.