व्हिडिओ पाहण्यासाठी

यहोवाचे साक्षीदार इतरांच्या भावनांचा आदर करतात, पण तरी ते राष्ट्रीय सणांमध्ये किंवा कार्यक्रमांमध्ये भाग का घेत नाहीत?

यहोवाचे साक्षीदार इतरांच्या भावनांचा आदर करतात, पण तरी ते राष्ट्रीय सणांमध्ये किंवा कार्यक्रमांमध्ये भाग का घेत नाहीत?

 आम्ही यहोवाचे साक्षीदार सरकारांचा आणि राष्ट्रीय प्रतीकांचा आदर करतो. आम्ही ही गोष्ट मान्य करतो, की काही लोक राष्ट्रीय प्रतिज्ञा म्हणण्याची, झेंड्याला सलामी देण्याची किंवा राष्ट्रगीत गाण्याची निवड करतील.

 पण, यहोवाचे साक्षीदार अशा कोणत्याही कार्यक्रमांमध्ये भाग घेत नाहीत. कारण, आमचा असा विश्‍वास आहे की अशा गोष्टी बायबल शिकवणींच्या विरोधात आहेत. आणि आम्हाला असं वाटतं, की आम्ही जसं इतरांच्या विचारांचा आणि निर्णयांचा आदर करतो, तसंच आमच्याही विश्‍वासाचा आदर केला जावा.

या लेखात

 आम्ही कोणत्या बायबल शिकवणींचं पालन करतो?

 पुढे दिलेल्या बायबलमधल्या दोन महत्त्वपूर्ण शिकवणींमुळे आम्ही अशा कार्यक्रमांमध्ये भाग घेत नाही:

  •   फक्‍त देवालाच आमची उपासना मिळवण्याचा हक्क आहे. बायबलमध्ये म्हटलंय: “तू फक्‍त तुझा देव यहोवा याचीच उपासना कर आणि फक्‍त त्याचीच पवित्र सेवा कर.” (लूक ४:८) बऱ्‍याच वेळा राष्ट्रीय प्रतिज्ञांमध्ये आणि राष्ट्रगीतांमध्ये असे शब्द आणि ओळी असतात ज्यात एक व्यक्‍ती देशाच्या भक्‍तीला किंवा देशप्रेमाला सर्वोच्च स्थान देण्याचं वचन देत असते. म्हणून यहोवाच्या साक्षीदारांना वाटतं, की अशा कार्यक्रमांमध्ये भाग घेणं त्यांच्यासाठी योग्य ठरणार नाही.

     तसंच, यहोवाच्या साक्षीदारांना असंही वाटतं, की झेंड्याला सलामी देणं हे उपासना करण्यासारखं किंवा मूर्तिपूजा करण्यासारखं आहे, आणि बायबलमध्ये मूर्तिपूजा करायला मनाई करण्यात आली आहे. (१ करिंथकर १०:१४) काही इतिहासकारसुद्धा हे मान्य करतात की राष्ट्रांचे झेंडे हे एका अर्थाने धार्मिक प्रतीकं आहेत. इतिहासकार कार्लटन. एच. हेज a हे असं म्हणतात: “राष्ट्रवादाचं मुख्य चिन्ह आणि उपासनेचं प्रतीक म्हणजे झेंडा.” पहिल्या शतकात रोमन साम्राज्यात असा समज होता, की प्रत्येक व्यक्‍तीची रक्षा करण्यासाठी एक स्वर्गदूत असतो. आणि खासकरून रोमन सम्राटाची रक्षा करणाऱ्‍या स्वर्गदूताला पवित्र मानलं जायचं. त्यामुळे पहिल्या शतकातल्या ख्रिश्‍चनांबद्दल लिहिताना लेखक डॅनिएल मॅनिक्स यांनी असं म्हटलं: “ख्रिश्‍चनांनी [रोमन] सम्राटाची रक्षा करणाऱ्‍या स्वर्गदूताला बलिदान देण्याचं नाकारलं. हे आजच्या काळात झेंड्याला सलामी द्यायला नाकारण्यासारखंच आहे.” b

    यहोवाचे साक्षीदार झेंड्याला सलामी देत नसले, तरी ते त्याचा अपमान करत नाहीत किंवा त्याची जाळपोळ करत नाहीत. तसंच, ते झेंड्याचा किंवा इतर कोणत्याही राष्ट्रीय चिन्हांचा अनादर करत नाहीत.

  •   सगळी माणसं देवासमोर समान आहेत. (प्रेषितांची कार्यं १०:३४, ३५) बायबलमध्ये म्हटलंय की, देवाने “एका माणसाद्वारे सगळी राष्ट्रं बनवली.” (प्रेषितांची कार्यं १७:२६) म्हणून यहोवाचे साक्षीदार असं मानतात, की एखाद्या राष्ट्राच्या किंवा वंशाच्या लोकांना इतरांपेक्षा श्रेष्ठ समजणं हे चुकीचं ठरेल. आम्ही सर्व लोकांचा आदर करतो, मग ते कोणत्याही वंशाचे असो किंवा कुठेही राहत असो.—१ पेत्र २:१७.

 अशा कार्यक्रमांमध्ये भाग घेणं कायद्याने बंधनकारक असेल तर काय?

 यहोवाचे साक्षीदार कोणत्याही सरकारचा विरोध करत नाहीत. आम्ही असं मानतो की सरकारं ही “देवाने घालून दिलेल्या व्यवस्थेचा” भाग आहेत आणि त्यानेच त्यांना राहू दिलंय. (रोमकर १३:१-७) आम्ही असंही मानतो की सरकारी अधिकारी ज्या सूचना देतात आणि जे सांगतात ते ख्रिश्‍चनांनी पाळलं पाहिजे.—लूक २०:२५.

 पण देवाच्या आज्ञेच्या आणि शिकवणींच्या विरोधात जाऊन एखादा कायदा काही करायला सांगत असेल तर काय? अशा वेळी काही बाबतींत कायद्यामध्ये बदल करण्याची किंवा सूट देण्याची सरकारला विनंती केली जाऊ शकते. c पण जेव्हा कोणताही बदल करणं शक्य नसतं तेव्हा यहोवाचे साक्षीदार ‘माणसांपेक्षा देवाची आज्ञा पाळतात.’ पण असं करताना ते कोणत्याही प्रकारे सरकारचा अनादर करत नाहीत.—प्रेषितांची कार्यं ५:२९.

 असं करून यहोवाचे साक्षीदार एखादा सामाजिक किंवा राजकीय मुद्दा मांडण्याचा, किंवा त्याची बाजू घेण्याचा प्रयत्न करत आहेत का?

 नाही. यहोवाचे साक्षीदार सामाजिक किंवा राजकीय मुद्द्‌यांध्ये कोणाचीही बाजू घेत नाहीत. आम्ही राष्ट्रीय प्रतिज्ञा म्हणत नाही, झेंड्याला सलामी देत नाही किंवा राष्ट्रगीत गात नाही. पण याचा अर्थ असा नाही की आम्ही एखादी राष्ट्रविरोधी चळवळ चालवतोय. उलट, बायबलमधून शिकलेल्या गोष्टींमुळे आम्ही राष्ट्रीय कार्यक्रमांमध्ये भाग घेत नाही.

a एसेज ऑन नॅशनलिझम,  पान क्र. १०७-१०८.

b द वे ऑफ द ग्लॅडिएटर,  पान क्र. २१२.