व्हिडिओ पाहण्यासाठी

यहोवाचे साक्षीदार अशा लोकांसोबत आपला संबंध तोडतात का ज्यांनी त्यांच्यासोबत उपासना करायचे सोडून दिले आहे?

यहोवाचे साक्षीदार अशा लोकांसोबत आपला संबंध तोडतात का ज्यांनी त्यांच्यासोबत उपासना करायचे सोडून दिले आहे?

 ज्यांचा यहोवाचे साक्षीदार म्हणून बाप्तिस्मा झाला होता पण आता ते इतरांना जाऊन प्रचार करत नाहीत, आपल्या सहउपासकांसोबत सहवास ठेवत नाहीत अशांसोबत आम्हीनाते तोडत नाही.  याउलट, त्यांना आध्यात्मिक रीत्या मदत करण्यासाठी आम्ही स्वतःहून पुढाकार घेतो.

 गंभीर पाप करणाऱ्‍या व्यक्‍तीला तडकाफडकी बहिष्कृत केले जात नाही. पण, बाप्तिस्मा झालेली एखादी व्यक्‍ती बायबलच्या नैतिक तत्त्वांचे वारंवार उल्लंघन करत असेल आणि त्याबद्दल पश्‍चात्ताप करत नसेल तर तिला मंडळीतून बहिष्कृत केले जाते. कारण बायबल अगदी स्पष्टपणे म्हणते: “दुष्टाला आपल्यामधून घालवून द्या.”—१ करिंथकर ५:१३.

 अशा मनुष्याबद्दल काय ज्याला बहिष्कृत करण्यात आले आहे पण ज्याची बायको-मुले यहोवाचे साक्षीदार आहेत? अशा वेळी, त्याचे आपल्या कुटुंबासोबत असलेले सर्व धार्मिक नातेसंबंध संपुष्टात येतात, पण रक्‍ताचे नाते मात्र टिकून राहते. त्याचे वैवाहिक नातेसंबंध, कुटुंबातल्या सदस्यांसोबत असलेले आपुलकीचे नाते व इतर व्यवहार पूर्वीसारखेच राहतात.

 बहिष्कृत झालेली व्यक्‍ती आमच्या धार्मिक सभांना उपस्थित राहू शकते. आणि इच्छा असल्यास ती मंडळीतील ख्रिस्ती वडिलांचा सल्लाही घेऊ शकते. यामागचा हेतू त्या व्यक्‍तीला पुन्हा यहोवाचा साक्षीदार बनण्यास मदत करणे हा आहे. बहिष्कृत झालेली व्यक्‍ती आपले चुकीचे आचरण सोडून देते आणि मनापासून बायबलच्या स्तरांनुसार जीवन व्यतीत करण्याची तयारी दाखवते तेव्हा तिला मंडळीत यहोवाची साक्षीदार म्हणून पुन्हा स्वीकारलं जातं.