व्हिडिओ पाहण्यासाठी

हर्मगिदोन म्हणजे काय?

हर्मगिदोन म्हणजे काय?

बायबलचं उत्तर

 मानवी सरकारं आणि देव यांमध्ये होणाऱ्‍या शेवटच्या लढाईला बायबलमध्ये हर्मगिदोनचं युद्ध असं म्हटलंय. आजसुद्धा मानवी सरकारं आणि त्यांना साथ देणारे लोक देवाच्या अधिकाराच्या अधीन व्हायचं नाकारतात. असं करून ते त्याचा विरोध करतात. (स्तोत्र २:२) हर्मगिदोनच्या युद्धात मानवी शासनाचा अंत होईल.​—दानीएल २:४४.

 “हर्मगिदोन” हा शब्द बायबलमध्ये फक्‍त एकदाच प्रकटीकरण १६:१६ इथे येतो. प्रकटीकरणातल्या भविष्यवाणीत असं सांगितलंय, की “इब्री भाषेत हर्मगिदोन म्हटलेल्या ठिकाणी” ‘संपूर्ण पृथ्वीवरच्या राजांना,’ “सर्वसमर्थ देवाच्या मोठ्या दिवसाच्या युद्धासाठी’ एकत्र केलं जाईल.​—प्रकटीकरण १६:१४.

 हर्मगिदोनच्या युद्धात कोण लढतील? येशू ख्रिस्ताच्या नेतृत्वाखाली स्वर्गातलं सैन्य देवाच्या शत्रूंविरुद्ध लढेल आणि त्यांच्यावर विजय मिळवेल. (प्रकटीकरण १९:११-१६, १९-२१) या शत्रूंमध्ये असे सर्व जण असतील जे देवाच्या अधिकाराचा विरोध करतात आणि त्याला तुच्छ लेखतात.​—यहेज्केल ३९:७.

 हर्मगिदोनचं युद्ध मध्य पूर्वेत लढलं जाईल का? नाही. हे युद्ध कोणत्याही एका भागापुरतं मर्यादित नसेल, तर संपूर्ण पृथ्वी त्यात सामील असेल.​—यिर्मया २५:३२-३४; यहेज्केल ३९:१७-२०.

 हर्मगिदोनला कधीकधी “हर-मगिदोन” (हिब्रूमध्ये हर मेगिद्दोन) म्हटलंय. ज्याचा अर्थ “मगिद्दोचा पर्वत” असा होतो. मगिद्दो हे प्राचीन इस्राएल देशातलं एक शहर होतं. इतिहासातून कळतं की या शहराच्या आसपासच्या क्षेत्रात बऱ्‍याच महत्त्वाच्या लढाया लढल्या गेल्या. यांत बायबलमध्ये उल्लेख केलेल्या काही लढायासुद्धा आहेत. (शास्ते ५:१९, २०; २ राजे ९:२७; २३:२९) असं असलं तरी, हर्मगिदोन हे प्राचीन मगिद्दो शहराच्या आसपास असलेल्या खरोखरच्या क्षेत्राला सूचित करू शकत नाही. तिथे आज कोणताही मोठा पर्वत नाही आणि जवळच्या संपूर्ण इज्रेलच्या खोऱ्‍यातसुद्धा देवाचे सगळे शत्रू मावतील इतकी जागा नाही. खरं पाहिलं तर, हर्मगिदोन हे अशा एका जागतिक परिस्थितीला सूचित करतं, ज्यात सगळी राष्ट्रं शेवटच्या वेळी एकत्र येऊन देवाच्या शासनाचा विरोध करतील.

 हर्मगिदोनच्या युद्धाच्या वेळी परिस्थिती कशी असेल? देव आपल्या शक्‍तीचा कसा वापर करेल हे आपल्याला माहीत नाही. पण त्याने आधी जी शस्त्रं वापरली होती, जसं की गारा, भूकंप, मुसळधार पाऊस, आग व गंधक, विजांचा कडकडाट आणि रोगराई यांपैकी कोणतीही तो वापरू शकतो. (ईयोब ३८:२२, २३; यहेज्केल ३८:१९, २२; हबक्कूक ३:१०, ११; जखऱ्‍या १४:१२) या सगळ्या गोंधळात देवाच्या शत्रूंपैकी काही जण एकमेकांचाच जीव घेतील. पण शेवटी त्यांना समजेल की देवच त्यांच्याविरुद्ध लढत आहे.​—यहेज्केल ३८:२१, २३; जखऱ्‍या १४:१३.

 हर्मगिदोनच्या युद्धात जगाचा नाश होईल का? या युद्धात पृथ्वी ग्रहाचा नाश होणार नाही, कारण पृथ्वी ही मानवांसाठी कायमचं घर आहे. (स्तोत्र ३७:२९; ९६:१०; उपदेशक १:४) हर्मगिदोनचं युद्ध मानवजातीचा नाश करण्यासाठी नाही, तर तिला वाचवण्यासाठी लढलं जाईल. त्यात देवाच्या सेवकांचा “एक मोठा लोकसमुदाय” वाचेल.​—प्रकटीकरण ७:९, १४; स्तोत्र ३७:३४.

 बायबलमध्ये “जग” हा शब्द फक्‍त पृथ्वीला सूचित करण्यासाठी वापरण्यात आलेला नाही. तर देवाच्या विरोधात वागणाऱ्‍या दुष्ट मानवसमाजाला सूचित करण्यासाठीही हा शब्द काही ठिकाणी वापरण्यात आला आहे. (१ योहान २:१५-१७) त्यामुळे हर्मगिदोनच्या युद्धात “जगाचा शेवट” होईल, याचा अर्थ दुष्ट मानवसमाजाचा अंत होईल असं म्हणता येईल.​—मत्तय २४:३, ईझी-टू-रीड व्हर्शन.

 हर्मगिदोनचं युद्ध कधी होईल? ‘मोठ्या संकटाचा’ शेवट हर्मगिदोनाच्या युद्धाने होईल. या मोठ्या संकटाबद्दल सांगताना येशूने म्हटलं: “त्या दिवसाबद्दल आणि त्या वेळेबद्दल कोणालाही माहीत नाही, स्वर्गदूतांना नाही आणि देवाच्या मुलालाही नाही; फक्‍त पित्याला माहीत आहे.” (मत्तय २४:२१, ३६) पण असं असलं तरी, हर्मगिदोन हे येशूच्या अदृश्‍य उपस्थितीदरम्यान (जी १९१४ मध्ये सुरू झाली) होईल असं बायबलच्या भविष्यवाण्यांवरून कळतं.​—मत्तय २४:३७-३९.