व्हिडिओ पाहण्यासाठी

डावीकडे: प्रांतीय अधिवेशन झालं तिथे आत जायची जागा. उजवीकडे: भाऊबहीण लक्ष देऊन कार्यक्रम बघत आहेत.

१ नोव्हेंबर २०२३
भारत

अधिवेशनात झालेल्या बॉम्बस्फोटानंतर भारतातले साक्षीदार एकमेकांना मदत आणि सांत्वन देत आहेत

अधिवेशनात झालेल्या बॉम्बस्फोटानंतर भारतातले साक्षीदार एकमेकांना मदत आणि सांत्वन देत आहेत

jw.org वर आधीच दिलेल्या बातमीप्रमाणे, रविवार, २९ ऑक्टोबर २०२३ ला भारतातल्या केरळमध्ये झालेल्या अधिवेनात एकानंतर एक काही बॉम्बस्फोट झाले. त्यात दोन बहिणींचा मृत्यू झाला. दुःखाची गोष्ट म्हणजे या बॉम्बस्फोटात झालेल्या दुखापतींमुळे एका १२ वर्षांच्या मुलीचासुद्धा आता मृत्यू झालाय. तसंच, आणखीन ५५ भाऊबहीण जखमी आहेत. त्यांच्यापैकी काही जण खूप गंभीर रितीने भाजले आहेत.

सध्या, तीन बहिणी आणि दोन भाऊ अजूनही हॉस्पिटलमध्ये आहेत आणि त्यांची परिस्थिती खूप नाजूक आहे. सकाळच्या प्रार्थनेच्यावेळी म्हणजे जवळपास ९:४० ला कमीतकमी तीन बॉम्बस्फोट झाले, असं अधिकाऱ्‍यांनी सांगितलं. संशयित गुन्हेगार आता पोलिसांच्या ताब्यात आहे. आणि याबद्दल पुढची चौकशी सुरू आहे.

या अधिवेशनाच्या ठिकाणी ज्यांनी तातडीची सेवा देऊन मदत केली आणि जे हॉस्पिटल कर्मचारी जखमीं भाऊबहिणींची देखभाल करत आहेत, त्यांचे आम्ही मनापासून आभार मानतो.

तिथे हजर असलेल्या भाऊबहिणींनी पाहिलं, की सगळे एकमेकांना मदत करत होते आणि एकमेकांवर असलेलं प्रेम दाखवत होते. बॉम्बस्फोट झाले तेव्हा तिथे हजर असलेली एक बहीण म्हणाली, “मी लगेच यहोवाला प्रार्थना करू लागले. अटेंडंट्‌सनी आणि इतर भावांनी आमची खूप चांगली काळजी घेतली आणि आम्हाला सुरक्षित बाहेर काढण्यासाठी लगेच धावून आले. यावरून आम्हाला कळलं, की आमच्यापैकी प्रत्येकाची यहोवाला किती काळजी आहे आणि त्याचं आमच्यावर किती प्रेम आहे.”

भारताच्या शाखाकार्यालाचे प्रतिनीधी, विभागीय पर्यवेक्षक आणि स्थानिक वडील या घटनेमुळे प्रभावित झालेल्या भाऊबहिणींना सतत आध्यात्मिक आणि व्यावहारिक मदत पुरवत आहेत. या हल्ल्यामुळे प्रभावित झालेल्या भाऊबहिणींचं सांत्वन करण्यासाठी शाखा कार्यालयातून केरळला गेलेले एक वडील म्हणाले, “हे खरंय की बऱ्‍याच जणांना या घटनेमुळे धक्का बसलाय आणि त्यांना खूप त्रास सहन करावा लागतोय. तरी, ते ही परिस्थिती ज्या प्रकारे हाताळतायत, ते पाहून मला खूप प्रोत्साहन मिळालं. मी त्यांच्यातल्या बऱ्‍याच जणांशी बोललो आणि त्यांनी यहोवावर कशा प्रकारे भरवसा ठेवलाय हे मी स्वतः डोळ्यांनी पाहिलं. आणि त्यामुळे माझा स्वतःचा विश्‍वास खूप मजबूत झालाय.”

भारतात घडलेल्या या भयानक घटनेने प्रभावित झालेल्या भाऊबहिणींसाठी आणि त्यांच्या कुटुंबांसाठी, जगभरातले सगळे भाऊबहीण प्रार्थना करत आहेत. भविष्यात हिंसा, दुःख आणि मृत्यू नसेल, या बायबलमध्ये दिलेल्या वचनामुळे आम्हाला दिलासा मिळतो. यहोवा देवावर पूर्ण भरवसा ठेवण्याचा आमचा निश्‍चय पक्का आहे.​—स्तोत्र ५६:३.